पार्थ पवार अन मी मित्र, प्रकरण काय ते मिटवून घ्या ; पार्थ पवारांच्या नावाचा वापर करुन थेट पोलिसांवरच दबाव

पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (parth pawar)हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येत असतात. मात्र यावेळी पार्थ पवार हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. पार्थ यांच्या नावाचा वापर करुन पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील (Hinjavadi Police station) अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा यासाठी दबाव टाकल्याचे पोलीस अधिकारी नकुल न्यामने यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (28 मार्च) घडला.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितेनुसार आरोपी अश्रफ मर्चंट हिंजवडी पोलिसांवर पार्थ पवार यांच्या नावाने दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील आरोपी असलेल्या अमित कलाटे याच्यावरील गुन्हे मिटवा असा दबाव टाकण्यात आला. घटनेच्या वेळी आरोपी अश्रफ मर्चंट पोलिसांना फोन करून मी आणि पार्थ पवार यांचे पी ए सागर जगताप अमित कलाटेचे मित्र आहोत मी तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, वाटल्यास तुम्हाला मी जिजाई बंगला, भोसले नगर येथे थेट समोर घेऊन जाईन, अमितचा काय असेल तो विषय तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर हा विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील (umesh patil NCP) यांनी देखील मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे. असे बोलून आरोपीने फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.