सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी दिलेली सशर्त परवानगी ही सर्वांसाठी आनंदाची बातमी – जयंत पाटील

मुंबई  – सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. ही बातमी आपल्या सर्वांसाठी आनंदाची असून या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.

शर्यत सुरू व्हावी ही पुणे जिल्हयातील व राज्यभरातील शेतकरी बांधवांची भावना होती. या भावनांचा मान राखत महाविकास आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या माननीय खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला. राज्यसरकारमार्फत तज्ज्ञ वकीलांची टीम लावली आणि आज हा आनंदाचा दिवस उजाडला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

खिलारसारख्या इतर प्रजातींचेही संवर्धन व्हावे यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देत जयंत पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांचे व त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.