विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा विखे पाटलांच्या नावाची होती मात्र उमेदवारी मिळाली नार्वेकरांना 

Mumbai – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडामध्ये शिवसेनेतून 39 आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सध्या राज्यात सत्तांतर झालंय त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) आता लवकरच भरलं जाणार आहे.

यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांना महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

भाजपाकडून सुरुवातीला उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच ते ज्येष्ठ नेते असून त्यांना विधिमंडळ कामकाजाचा चांगला अनुभव आहे. मात्र, भाजपाच्या बैठकीनंतर राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.