ब्रिजभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्याबाबत सन्मानाची भावना व्यक्त केली होती, तेच भाजपला खटकलं – मिटकरी

मुंबई – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) हे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय म्हणजे शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात संदीप भोंडवे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.

भाजपचे खासदार बृजभुषण सिंग (BJP MP Brijbhushan Singh) हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत. बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाकडं तक्रार देखील करण्यात आली होती.

या निर्णयावर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे. भारतीय कुस्तीगीर संघटना जरी स्वायत्त असली तरी तिच्यावर भाजपचे दडपण आहे. संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्याबाबत सन्मानाची भावना व्यक्त केली होती, तेच त्यांना खटकलं. शरद पवार यांना गुरु मानले, हे भाजपला पाहवल गेलं नाही, म्हणून कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

दबावतंत्राचा वापर करुन दिल्लीत झालेल्या परिषदेच्या बैठकीत थातूर मातूर कारणे देऊन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. यामागे भाजपचं राजकारण आहे. सुडाच्या भावनेने राज्य कुस्तीगीर परिषदेवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.