एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आता कॉंग्रेसला सुद्धा फटका, आठ आमदार फुटण्याची शक्यता 

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. याशिवाय आणखी १० आमदार लवकरच माझ्यासोबत येणार आहेत. पण मला कोणावरही टीका करायची नाही. गुवाहाटी विमानतळावर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.  विशेष म्हणजे शिंदे सोमवारी रात्री उशिरा शिवसेनेच्या काही आमदारांसह मुंबईहून निघाले होते. यानंतर त्यांनी गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकला. मात्र नंतर त्यांनी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, एका बाजूला शिवसेनेला भगदाड पडले असताना आता दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला सुद्धा गळती लागणार असल्याचे सांगितले जात आहे. न्यूज 18 लोकमतला गोव्यातील एका मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे आठ आमदार हे लवकरच गोव्यात दाखल होणार असून त्यांची व्यवस्था राखण्यात येणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे शिंदे यांच्या बंडाचा आता कॉंग्रेसला सुद्धा फटका बसू शकतो असं दिसतंय.