जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम सुरू झालं आहे; जयंत पाटलांची टीका

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून नेते आणि कार्यकर्ते भाजप आणि ईडीवर सैरभैर झाल्याप्रमाणे टीका करू लागले आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा आणखी एका सत्तेचा दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे अशा पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी त्यावर आवाज उठवला होता म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे काम असेल असेही जयंत पाटील म्हणाले. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम सुरू झालं आहे असेही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.