फ्रान्सिस सिल्वेरा लोकांना धमकावत असल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप

पणजी – आम आदमी पक्षाचे सांत आंद्रे मतदारसंघाचे उमेदवार रामराव वाघ यांनी भाजपचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यावर थेट हल्ला चढविला आहे. सिल्वेरा यांनी सगळेच प्रकल्प अर्ध्यावर सोडले आहेत. सरकारी पैसा वाया कसा घालवायचा याचे आदर्श उदाहरण सिल्वेरा यांनी घातले आहे. बेजबाबदार कामामुळे जनता वैतागलेली आहे आणि सिल्वेरा हे लोकांना धमकावत असल्याचा आरोप रामराव यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाचे सेंट आंद्रेचे उमेदवार रामराव वाघ म्हणाले की, 2017 ची निवडणूक विकासाच्या मैदानावर लढवणारे सिल्वेरा त्यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे विकास प्रकल्प राबवण्यात अपयशी ठरले आहेत.

वाघ म्हणाले, कि ‘खरं तर सिल्वेरा यांनी 10-15 वर्षांपूर्वी सुरू केलेला जुना डोंगरी पूल प्रकल्प पूर्ण करण्यातही अपयश आले आहे. या बाबत सिल्वेरा यांनी याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या शेतजमिनी गेल्या आहेत, ज्याची भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. वीज, पाणीपुरवठा तसेच चांगले रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांचाही सांत आंद्रे मध्ये अभाव आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘सध्या सांत आंद्रे येथील स्थानिक प्रशासकीय संस्थांना अधिकार नाही. सर्व निर्णय विद्यमान आमदार घेतात. जे स्थानिक अधिकारी कठोर परिश्रम घेत होते त्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सांत आंद्रे मतदारसंघाने निर्भय होण्याची गरज आहे. ही भीती आमदार असताना माझा भाऊ विष्णू वाघ यांनी दूर केले होते आणि त्यामुळे अनेक विकासकामे पूर्ण झाली. दुर्दैवाने येथील लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाघ पुढे म्हणाले कि सांत आंद्रे मध्ये खजान शेती हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे, बांधाची दुरुस्ती होत नसल्याने शेतात पाणी भरून ते नष्ट होण्याचे प्रकार वाढत आहेत . खजान कृती समिती च्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा पुढे आणला आहे. हा प्रश्न अनेकदा आला. आमदारांनी मात्र याकडे लक्ष दिलेले नाही.

‘युवकांना नोकऱ्या आणि सुरक्षित भविष्याची आस असल्याने या मतदारसंघाला बेरोजगारीची समस्याही भेडसावत आहे. अलीकडेच सांत आंद्रे येथे अन्याय झाला आहे, कारण गोमेकोच्या सर्व नोकऱ्या स्थानिकांना न देता सत्तरीत देण्यात आल्या आहेत. हे योग्य नाही. सांता क्रुझचे रहिवासी आमदारांकडे न्हावशी येथील मरिना प्रकल्प रद्द करण्याची आणि झुआरी नदीतील अवैध मासेमारी थांबवण्याची मागणी करत आहेत. मात्र, आमदारांनी त्याचे ऐकले नाही, असे ते म्हणाले.

‘आप’ला मत दिल्यास, खजान शेतात सुधारणा करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. मी मतदारसंघातील बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील काम करेन. मी शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि मूलभूत सुविधा देण्यासाठी देखील प्रयत्न करेन. सध्या काँग्रेसला मतदान करणे म्हणजे गेल्या निवडणुकीत सांत आंद्रे मतदारांनी अनुभवल्याप्रमाणे भाजपला पाठिंबा देण्यासारखे आहे . या कारणास्तव, मी लोकांना आप ला मत देण्याचे आवाहन करत आहे’, असेही ते पुढे म्हणाले.