मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नगरपालिका अधिकारी व कंत्राटदारांची झाडाझडती

येवला – येवला शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यासह अधिकारी व कंत्राटदार यांच्यासमवेत एकत्रित बैठक घेत आढावा घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची झाडाझडती घेतली. यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल अशी तंबी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात येवला शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येवला शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी प्रांत अधिकारी ज्योती कावरे (Jyoti kavare), तहसीलदार प्रमोद हिले (Pramod hile), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि बी पाटील, उप कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,दिपक लोणारी, प्रवीण बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहारातील सांडपाणी भूमिगत गटार, सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, शॉपिंग सेंटर, गार्डन, शहर स्वच्छता यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्षात पाहणी केली. येवला शहरात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. कामाबाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रार येणार नाही याची दखल घ्यावी. रखडलेल्या अर्धवट कामे पूर्ण करण्यास दिरंगाई होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.