उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल…; अजित पवार भडकले

मुंबई – उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता हेच चुकीचे आहे. ‘या’ उदाहरणाची आणि ‘त्या’ उदाहरणाची तुलनाच होऊ शकत नाही. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल… छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक आज प्रदेश कार्यालयात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. आग्रात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. यांना कुणी बंदी केले होते असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा आणि नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अधिवेशनात काम करणार असल्याची माहिती पवार यांना दिली असेही अजित पवार म्हणाले.

याशिवाय आता तातडीने घडणाऱ्या घटना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये, सीमावाद प्रकरण, पीकविमा यावरही चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींचा आदरणीय शरद पवारसाहेबांना अनुभव असल्याने त्यांनी यावर मार्गदर्शन केले.

६ डिसेंबर रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत होणार असून या बैठकीमध्ये शेतकरी दिंडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित का नव्हते याची कारणेही अजित पवार यांनी सांगितली.