‘सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे’

Mumbai  – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, यावर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (devendra bhuyar) यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक,सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही चुकीचं करतील अस वाटत नाही, असे भुयार यांनी सांगितलं.सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे, असे सांगत भुयार यांनी महाविकास आघाडीला सरकारला धोका असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.