पवारसाहेबांवर टिका- टिप्पणी करण्याची निलेश राणे याची लायकी नाही – महेश तपासे

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र भाजपनेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना निलेश राणे यांनी शरद पवार दाऊदचा माणूस आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अनेक गंभीर आरोप असणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतरही त्यांचा महाविकास आघाडी सरकारनं राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना निलेश राणेंनी हे विधान केलंय. नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत, असं राणे यांनी म्हटलंय. ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल  देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’ असा सवाल निलेश राणे यांनी विचारलाय.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देखील आता या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पवारसाहेबांवर टिका- टिप्पणी करण्याची निलेश राणे याची लायकी नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार समाचार घेतला.

गेली ५५ वर्षे पवारसाहेबांनी महाराष्ट्राची व देशाची समाजसेवेतून, राजकारणाच्या माध्यमातून अविरत सेवा केली आहे आणि आजही करत आहेत हे कदाचित निलेश राणेला माहीत नाही. पवारसाहेबांच्या केसाएवढीदेखील उंची किंवा लायकी निलेश राणे याची असती तर ते यशस्वी राजकारणी दिसले असते असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.