मर्द माणसाला मी मर्द आहे असं सांगण्याची गरज नसते, राणेंचा राऊतांवर प्रहार

मुंबई : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या वादात आता नारायण राणे यांनी देखील उडी घेतली आहे. चुकीच्या कामामुळे घाबरून त्यांना आता घाम फुटला होता, खंर तर हे सांगण्यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत नारायण राणे यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पहाणं आता महत्वाचे ठरेल.

काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 15 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला उपस्थित होता. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर किंवा आमचे मित्र राज्यसभेचे संजय राऊत यांची परिषदेत जी केविलवाणी परिस्थिती झाली होती, जो घाम फुटला होता तो कशामुळे फुटला होता, विरोधकांनी फोडला की चुकीच्या कामामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता, हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहे, असं बोलत राणेंनी राऊतांची खिल्ली उठवण्याचा प्रयत्न केला.

ते पुढे म्हणाले की, ते वारंवार सांगत होते की, मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. मर्द माणसाला मर्द आहे, असं सांगण्याची आवश्यकता नाही. जो घाबरतो तोच म्हणतो की, मी कुणाला घाबरत नाही. अरे आम्ही तुम्हाला घाबरतो का विचारलंच नाही. असं राणे म्हणाले. संजय राऊत यांनी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यभरातील शिवसेनेचे नेते, मंत्री येणार अशी जाहिरात होती. परंतु नाशिक चे काही कार्यकर्ते सोडल्यास त्याठिकाणी विभागप्रमुख, नेते, मंत्री कोणीही उपस्थित नव्हते.

संजय राऊत हे शिवसेना प्रमुख असल्याच्या आवेशात बोलत होते. त्या पत्रकार परिषद त्यांनी अपशब्दांचा वापर केला आहे. जका वृत्तपत्राच्या संपादकांनी आपल्या मर्यादा ठेवून कोणते शब्द वापरायला हवेत. त्यांनी भान ठेवायला हवं. मलाही असे शब्द वापरता येतात. परंतु मी हे शब्द वापरणार नाही, असंही राणे म्हणाले.