‘माझ्या वडिलांनी एकेकाळी ऊसतोडणी केलेली आहे, ऊसतोड कामगारांच्या व्यथा, वेदना मी जाणतो’

पुणे – लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे (सामाजिक न्याय भवन पुणे) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा दिवस माझ्यासाठी दसरा-दिवाळी पेक्षा मोठा ठरला! असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, माझ्या वडिलांनी एकेकाळी ऊसतोडणी केलेली आहे, ऊसतोड कामगारांच्या व्यथा, वेदना मी जाणतो, त्यांना करावे लागणारे अपार श्रम कमी व्हावेत व त्यांच्या आयुष्यातील विविध समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.महाविकास आघाडी सरकारने ज्याप्रमाणे महामंडळाला कायमस्वरूपी निधीची तरतूद केली त्याचप्रमाणे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या मोफत शिक्षणासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या माध्यमातून मोफत वस्तीगृहे यावर्षीपासून सुरू करत आहोत.

पुढे बोलताना ते म्हणाले, पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींसाठी 1000 क्षमतेचे वसतिगृह मंजूर करण्याची विनंती यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांना केली. चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्या संस्थांसोबत करार करण्याचा मानस आहे. ही मुले शिकून आपल्या पालकांचे नशीब बदलतील, असा विश्वास आहे. असं मुंडे यांनी म्हटले आहे.