‘युपीएचे नेतृत्व करण्यात पवारांच्या ओठात रस नाही पण पोटात आहे’

मुंबई – पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. दरम्यान, आता या मुद्द्यावर स्वतः शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे,असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

यावर आता भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी पवारांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, युपीएचे नेतृत्व करण्यात पवारांच्या ओठात रस नाही पण पोटात आहे. कारण ते बोलतात एक आणि करतात एक. त्यांचा नकार हा होकार असतो हे सर्वश्रुत आहे . कोल्हापुरात बोलताना पत्रकार परिषदेत त्यांनी अध्यक्ष पदात रस नसल्याची कबुली दिली मग दोन दिवस अगोदर दिल्लीत त्यांच्या पक्षाच्या युवा संघटनेच्या मेळाव्याला स्वतः पवार साहेब उपस्थीत होते . सर्वानुमते ठराव समंत झाला मग पवार साहेबांनी नकार का नाही दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना नेते संजय राऊत मागच्या दोन वर्षा पासून पवारांना आवडणारी भुमीका मांडतात , केंद्रात भाजपाला सक्षम विरोध करण्यासाठी देशात पवारांनी मोर्चे बांधणी चालू केली. नेतृत्वाबाबत त्यांनी संजय राऊतांना प्रवक्ता बनवले आहे. सर्व हालचाली पाहता पवारांनाच युपीए अध्यक्ष होण्यात जास्त रस असून राऊत जबाबदारी पार पाडत आहेत असं देखील ते म्हणाले.