हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे; मनसेची राज्यपालांवर टीका

मुंबई : राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुंबई-ठाण्यातून (Mumbai-Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

दरम्यान, मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी याच वक्तव्यावरून कोश्यारी यांना सुनावलं आहे.,मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका असं ते म्हणाले.

 

त्यांनी #संतापजनक #निषेध ह्या हॅशटॅग चा वापर करून अजून एक ट्विट केलं, पुरे आता …, यांनी आता घरी बसावं …, मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये …, नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा …,असं म्हणत गजान काळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोले लगावले आहेत.