भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे आहे – सुळे

मुंबई : राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुंबई-ठाण्यातून (Mumbai-Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी याच वक्तव्यावरून ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही ‘आमची मुंबई ‘ आहे.” असं त्या म्हणाल्या.

 

 

“महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते.याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे.” असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.