गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधीमधून कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण

पुणे: पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या धार्मिक विकास निधी मधून कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने विवेक खटावकर , गौरव बापट माजी विरोधी पक्ष नेते सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक योगेश समेळ आदी उपस्थित होते.

सुमारे २५ लक्ष रुपयांचा निधी खर्च करून कसबा गणपती मंदिराच्या परिसरात हे भित्तिचित्र प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारले. यावेळी बोलताना प्रशांत यादव यांनी कसब्याच्या राजकीय संस्कृतीचे कौतुक केले ते म्हणाले की निवडणुकीत एकमेकांच्या विरुध्द उभे असलेले दोन सहकारी एकाच व्यासपीठावर येतात हेच संस्कार पुण्याची तशीच कसब्याची राजकीय संस्कृतीची ओळख आहे. खासदार गिरीश बापट यांनी या परिसराचा विकास करण्यासाठी अनेक भरीव योजना कार्यान्वित केल्या, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे शिल्प आहे. धंगेकर म्हणाले की मी खासदार बापट यांनी त्यांच्या निधीमधून कसबा गणपतीच्या सुशोभिकरणासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो.

रासने म्हणाले की, आता निवडणुका संपल्या त्यामुळे आता विकासाची कामे ही एकमेकांच्या सहकार्याने करून या परिसराचा विकास कसा होईल? यावर एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.

प्रस्ताविक सुहास कुलकर्णी यांनी केले तर आभार कसबा गणपती मंदिराचे विश्वस्त विनायक ठाकर यांनी मानले सूत्रसंचालन योगेश समेळ यांनी केले
या शिल्पाविषयी विस्तृत माहिती खालील प्रमाणे

श्रीमहोत्कट-विनायक अवतार
श्रीगणेशाने प्रत्येक युगात अवतार घेतलेले आहेत. कृतयुग किंवा सत्ययुग, व्दापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग या चार युगात श्रीगणपती भगवंताचे अवतार आहेत. गणेश पुराणातील श्रीगजाननाचे चार अवतार आहेत. त्यातील पहिला अवतार आहे; श्रीमहोत्कट-विनायक, दुसरा श्रीमयुरेश्वर, तिसरा श्रीगजानन आणि चौथा अवतार आहे श्रीधुम्रकेतू. मुद्गल पुराणात श्रीविनायकाचे आठ अवतार असल्याचे सांगितले आहे.
कृतयुग किंवा सत्ययुगात श्रीमहोत्कट-विनायकाचा अवतार महर्षि कश्यप आणि देवमाता अदिति यांच्या पुत्र रूपाने झाला. “सिंहारुढो̣, दशभुज: कृते नाम्नां तेजोरूपी महाकाय: सर्वेषां वरदो वशी” I सिंहावर अरूढ असलेले तेजस्वी दशभुज श्रीगणेशाचे रूप श्रीमहोत्कट-विनायक नावाने प्रसिध्द झाले. या अवतारात श्रीमहोत्कट-विनायकाने विरजा, उद्यत, धुंधुर, इत्यादी तसेच धुम्रराज, दंतूर, ज्वालामुख अशा भयंकर राक्षस मायावी दैत्यांचा वध केला; तर शापित चित्रगंधर्वाला शाप मुक्त केले. समस्त चराचराला व्यापणारे, कालचक्राला गतीमान करणारे, श्रीविनायकाचे अनंत विराट, विश्वरूप म्हणजे श्रीमहोत्कट-विनायक.

IIश्रीII

श्रीमयूरेश्वर अवतार
त्रेता युगात श्रीगणेशाने श्रीमयूरेश्वर अवतार धारण केला. महाभयंकर दैत्यांच्या संहारासाठी श्रीगजाननाने देवाधिदेव महादेव आणि जगतजननी देवी पार्वती यांच्या पुत्र रूपाने श्रीमयूरेश्वर अवतार धारण केला. देवी पार्वतीच्या पुत्र रुपात याचे नाव श्रीगणेश झाले. हिमालयाच्या पर्वत रूपाने या बालकाचे नाव हेरंब ठेवले. “त्रेतायुगे बर्हिरूढ̣: षडभुजोप्यर्जुनच्छवि: मयूरेश्वर नाम्ना त विख्यातो भुवनभञये” I मोर, मयूर पक्षाने श्रीगणेशाची भक्ती करून, श्रीगणेशाचे वाहनपद मिळवले. श्रीगणेशास आपले इष्ट ईश्वर मानले. सहा हातांचे, अर्जुनवृक्षा प्रमाणे वर्ण असलेल्या श्रीमयूरेश्वराने या अवतारात गृध्दासुर, बालासूर, आणि सिंधू दैत्याने पाठवलेले दुदुंभी, शमसासुर अशा अनेक मायावी, भयंकर असुरांचा संहार केला. सर्वांना संकट मुक्त करून देवतांना त्यांचे स्थान प्रदान केले. या युगातील श्रीगणेशाचा मोर वाहन असलेला अवतार श्रीमयूरेश्वर अवतार या नावाने सर्व परिचित झाला.

IIश्रीII

श्रीगजानन अवतार
द्वापर युगातला श्रीगजानना अवतार शिवशंकर पार्वतीच्या पुत्र रूपाने झाला. “द्वापरे रक्तवर्णोऽसा वाखुरूढश्चतुर्भुज: गजानन इतिख्याता: पूजित: सूरमानवे” I या अवतारात श्रीगजाननाचे रूप रक्त वर्णी, मूषक वाहन असलेले चार भुजांचे आहे. महाउग्र, भयंकर सिंधूरासुराचा विनाश करण्यासाठी श्रीगजाननाने हा अवतार घेतला. शिवशंकराने आपला परम भक्त राजा वरेण्यास बाल गजाननास पुत्र म्हणून सुपूर्द केले. परंतु राजा वरेण्य बाल गजाननाला ओळखू शकला नाही. त्याने श्रीगजाननास वनात सोडले. वनातील आश्रमात रहाणाऱ्या महर्षि पराशर आणि ऋषीपत्नी वत्सला यांनी श्रीगजाननाचे पुत्रवत पालन पोषण केले.

क्रौंचगंधर्व नामक गंधर्वाला महर्षि वामदेवांनी मूषक होण्याचा शाप दिला. मूषक रुपी शापित क्रौंचगंधर्व महर्षि पराशर ऋषींच्या आश्रमात आल्यावर श्रीगजाननाने आपल्या पाशाने मूषकास शाप मुक्त केले. आपले लाडके वाहन होण्याचा मान दिला. यथाअवकाश श्रीगजानन अवताराने महाबलाढ्य, असुर सिंधूरासूराशी घनघोर युद्ध करून उन्मत्त सिंधूरासूराचा संहार केला. कालांतराने राजा वरेण्यास आपली चूक लक्षात आली. राजाने श्रीगजाननाची आराधना करून श्रीगजाननाकडून सारभूत ज्ञानोपदेश प्राप्त केला. सिंधूरासूरासह इतर दैत्यांचा नाश करून, राजा वरेण्यास ज्ञानोपदेश करत ‘गणेशगीता’ सांगितली. श्रीगजाननाने ऋषी, मुनींचे, साधू संतांचे, सर्व लोकांचे रक्षण केले. द्वापर युगातील श्रीगजाननाने घेतलेला अवतार, अधर्माचा नाश आणि सदाचाराची स्थापना करणारा आहे.

IIश्रीII

धुम्रकेतु अवतार
कलियुगात श्रीगणपतीचा होणारा अवतार धुम्रकेतु या नावाने होणार आहे. भविष्यात होणारा धुम्रकेतु अवतार मनुष्याच्या वाढलेल्या अनेक विकारांचे पारिपत्य करून, भूलोकीच्या निसर्गाचे रक्षण करणारा असेल. घोर कलियुगात श्रीगणपतीचा हा अवतार “कलौ तु धुम्रवर्णोऽसाअश्वारूढो̣ द्विहस्तवान् I धूम्रकेतुरिति ख्यातो म्लेंच्छा विनाशकृत I द्विभूज असून, अश्व-घोड्यावर स्वार असेल. या अवतारात श्रीगणपती धुम्रकेतु या नावाने प्रसिध्द होऊन शत्रूचे पारिपत्य करेल. भविष्यातील कलियुगात अधर्म, अत्याचार, दुराचाराच्या घोर अंधकाराची, दारुण परीस्थिती जेंव्हा असेल, त्या समयी ‘धुम्रकेतु’ चे रूप दिव्य तेजस्व कांती असलेले हातात खड्ग घेतलेले, अश्वारूढ होईल. आपल्या परम तेजाने शत्रूचा विनाश करत अधर्म दुराचाराचा नाश करेल. सत्यधर्माची स्थापना होईल. आणि पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल.

कलियुगी अवतरीत होणारा श्रीगणपतचा धुम्रकेतु अवतार भविष्यातील येणाऱ्या संकटांचा विनाश करणारा, समस्त सृष्टीची स्थापना करणारा, धर्माचरणाने सर्व मंगलाची पुनरस्थापना करणारा आहे.

राजमाता जिजाऊ साहेबांनी बाल शिवाजीराजांसह उध्वस्त झालेल्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवून नवीन वस्ती वसवली. प्राचीनकाळचे पुण्यकविषय, पुनवडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यभूमीवर लालमहाला सारख्या पवित्र, पराक्रमाचे प्रतिक झालेल्या वास्तूचा पाया रचला गेला. वाडे, वस्ती वसू लागली. स्वराज्याचा प्रारंभ स्वयंभू श्रीकसबा गणपतीच्या साक्षीने, स्थापनेने सुरु झाला. आलुतेदार-बलुतेदारांनी कसबे पुणे समृध्द होत गेले. राजमाता जिजाऊ साहेबांचा आशीर्वादाने, आणि शिवरायांच्या पराक्रमाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली गेली. न्यायाचे, निष्ठेचे, स्वधर्माचे स्वराज्य इथल्या पुण्यभूमीत विस्तारत गेले. कसबा गणपती म्हणजेच ‘जयती गणपती’ च्या साक्षीने आजचे पुणे शहर समृध्द झाले.