शेतकऱ्यांना हवामानाबद्दल साक्षर करणार – पंजाबराव डख

नांदेड – शेतकऱ्यांना  हवामानाबद्दल साक्षर करणार आणि शेतकऱ्याचे निसर्गा पासून होणारे नुकसान कमी करणार असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मांजरम येथे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाला उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.

पंजाबराव यांनी आपल्या व्याख्यानात शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज कसा ओळखायचा ,पाऊस कधी, किती पडत असतो, विजेपासून आपला बचाव कसा करायचा आणि सोयाबीन, कापूस, हरभरा यांचे उत्पादन कसे वाढवायचे याचे सविस्तर विवेचन आपल्या भाषणात त्यांनी केले. पुढच्या वर्षी नांदेड जिल्हात पुरेसा पाऊस पडेल आणि गावागावांमध्ये सर्वांनी झाडे लावून पावसाच्या तीव्रता कमी करावी असे सांगितले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम गावंडे यांनी आपल्या भाषणात राजकीय लोकांचे वाभोडे काढले व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जी लढणारी तरुण कार्यकर्ते आहेत त्याच्या पाठीशी लोकांनी उभे राहावे असे आवाहन केले.

सत्कारमूर्ती नांदेड जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे म्हणाले की, माझा गावकऱ्यांच्या वतीने झालेला हा सत्कार सर्व पुरस्कारापेक्षा मोठा सन्मान आहे.यासाठी मी कायम ऋणी राहील.

रयत क्रांती संघटना युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की, ताकाला जाऊन भांड लपवणारे आम्ही कार्यकर्ते नाही, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका ताकतीने आम्ही लढवणार आहोत आणि जिल्ह्यातील घराणेशाही व प्रस्थापितांच्या विरोधात आमची लढाई राहील