‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या; हायकोर्टाच्या दणक्यानंतर आता खुनाच्या कटाचा खटला चालणार 

केरळ : केरळ उच्च न्यायालयाने ( Kerala High Court ) अभिनेता दिलीप ( Actor Dilip ) आणि इतरांना चांगलाच दणका दिला आहे. दिलीपला  2017 मध्ये एका अभिनेत्रीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याबद्दल आणि हत्येचा कट रचल्याबद्दल अटक केली आहे.  या प्रकरणी  न्यायालयाने  मंगळवारी त्याच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यास आणि तपास हस्तांतरित करण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती झियाद रहमान एए (Justice Ziad Rahman AA) यांनी दिलीपची याचिका फेटाळून लावली ज्यामध्ये अभिनेत्याने आरोप केला होता की वैयक्तिक शत्रुत्वामुळे हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांना त्यात गोवले जात होते.

दिलीपने वकील फिलिप टी. वर्गीस यांच्यामार्फत दाखल केलेल्या आपल्या याचिकेत आरोप केला होता की, एफआयआरमध्ये हत्येचा कट रचल्याचा कोणताही उल्लेख नाही ज्यामुळे कोणताही गुन्हा घडल्याचे सूचित होईल. दरम्यान, फिर्यादी महासंचालक टीए शाजी आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त सरकारी वकील पी नारायणन यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला की एफआयआरमध्ये केलेल्या आरोपावरून असे सूचित होते की गुन्हा झाला आहे आणि त्यासाठी तपास सुरू करणे आवश्यक आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 116, 118, 120बी, 506 आणि 34 अंतर्गत अभिनेता आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचे 17 फेब्रुवारी 2017 च्या रात्री तिच्याच वाहनातून अपहरण करण्यात आले आणि विनयभंग केला गेला.  काही आरोपींनी या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ बनवला जेणेकरून अभिनेत्रीला ‘ब्लॅकमेल’ करता येईल. या प्रकरणात 10 जण आरोपी असून त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दिलीपलाही अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला जामीन मिळाला होता.