राजसाहेब आपने तो सबको धो डाला…..; तृप्ती देसाईंनी केले राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक

ठाणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर काल झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. राज्यात सुरु असलेलं गलिच्छ राजकारण,  मराठा आरक्षण ( Maratha reservation ),ओबीसी आरक्षण ( OBC reservation ), विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, राष्ट्रवादीचा जातीयवाद, समान नागरी कायदा, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रत्यके नेत्याचा शेलक्या शब्दात ठाकरी शैलीत समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. आपल्या भाषणातून ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा अक्षरशः बुरखा फाडला. दरम्यान, या धडाकेबाज भाषणामुळे महाविकास आघाडी घायाळ झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेलं भाषण भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांना चांगलेच भावले आहे. राज ठाकरे याचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, राजसाहेब आपने तो सबको धो डाला…..तर पक्षाच्या नेत्यांना लोकांना पैसे देऊन गर्दी गोळा करावी लागते परंतु तुमचा एक वेगळाच करिष्मा आहे जो जनतेला आवडतो, त्याचे रुपांतर मतात कदाचित मोठ्या प्रमाणात झालेले नसेल पण पुढील काळात नक्कीच त्याचे रूपांतर मतांमध्येसुद्धा होईल.

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा याबाबतीत आज तुम्ही घेतलेला पुढाकार नक्कीच पक्षाला मोठी उभारी देईल यात काही शंका नाही. मुस्लिम समाजाविषयी तुम्हाला द्वेष नाही परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन राज्य सरकारने केले पाहिजे हे तुमचे म्हणणे मात्र बरोबरच आहे. आपल्याला पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा असं त्यांनी म्हटले आहे.