चुरस वाढली : सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने (bjp) पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्याच नेत्यांना उमेदवारी दिल्याने मित्रपक्षांनी भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून जाहीर नाराजीही व्यक्त केली. या सर्व घडामोडी घडत असताना आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारीला भाजपने समर्थन दिले आहे.

आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सदाभाऊ खोत यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खोत यांनीही आज अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर पाचव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यातच सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देत भाजपने डाव टाकला आहे. पण मतांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.