“सरकारवर टीका करणाऱ्यांची ट्वीटर अकाउंट ब्लॉक करा, अन्यथा…”, शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्वीटरला धमकावलं

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. जॅक डोर्सी म्हणतात की, भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉर्सी यांनी दावा केला की, भारत सरकारने आपल्यावर दबाव आणला होता आणि भारतात ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती.

‘ब्रेकिंग पॉइंट्स’ या यूट्यूब चॅनलने ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातील एक प्रश्‍न असा होता की, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कधी कोणत्या सरकारकडून झाला होता का?

प्रत्युत्तरात डॉर्सी यांनी असे अनेकवेळा घडल्याचे सांगितले आणि डॉर्सीने भारताचे उदाहरण दिले. डोर्सी म्हणाले की, ‘सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याची धमकी दिली होती. तसेच नियम न पाळल्यास भारतातील ट्वीटरचे कार्यालय बंद करण्याची धमकी दिली होती. भारतासारख्या लोकशाही देशात हे सर्व घडल्याचे डोर्सींनी सांगितले.

कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली
नोव्हेंबर २०२०२ मध्ये, भारत सरकारने देशात तीन कृषी कायदे लागू केले होते. मात्र, कायदा लागू होताच त्यांचा विरोधही सुरू झाला आणि वर्षभरापासून देशभर आंदोलने झाली. अखेर एका वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. आंदोलनादरम्यान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.