वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा : नाना पटोले

लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी सरकारकडून मीडियावर दबाव.

मुंबई – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते दिसत नाही. लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी आता सरकारकडून मीडियावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे लाठीहल्ला झालाच नाही, असे फडणवीस निर्लज्जपणे सांगत आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन दादर येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेकडो वर्षांपासून चालत आलेली वारकरी परंपरा दरवर्षी शांततेत पार पडते. वारक-यांच्या नियोजनाची आणि शिस्तीची जगभरात दखल जाते पण काल आळंदीत पोलीसांच्या मुजोरपणामुळे वारीला गालबोट लागले. काही कारण नसताना पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला हे स्पष्ट दिसत आहे. मग लाठीमार झालाच नाही असा खोटा दावा करुन गृहमंत्री फडणवीस काय सिद्ध करु पहात आहेत? विरोधक राजकारण करत असल्याचा फडणवीसांचा आरोप हास्यास्पद आहे. आळंदीतील वारकऱ्यांवरील पोलीस लाठीहल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधाने ही बेजबाबदारपणाची, संवेदनाशून्य असून ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे. वारकऱ्यांची डोकी फोडता आणि वरून जनतेच्या भावना भडकवू नका, म्हणून उपदेश कसले करता? तुम्हाला गृहविभाग सांभाळता येत नाही त्या अपयशाचे खापर वारक-यांवर कशाला फोडता?

आळंदीत झालेला प्रकार महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला काळीमा फासणारा आहे. भारतीय जनता पक्षाला खोटे बोल, पण रेटून बोलची विकृती जडलेली आहे. त्याच मुशीत तयार झालेल्या फडणवीसांना आळंदीतला पोलीस अत्याचार दिसत नाही हे कोडगेपणाचे लक्षण आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी फडणवीस आता वारक-यांना दोष देऊन वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भाजपाचा आयटी सेल वारकऱ्यांनाही खोटे ठरवू लागला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. शिंदे फडणवीस सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.