बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा – मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे 

Mumbai – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला.

या बैठकीत ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘शिंदे तुम्हाला ते वापरतील आणि फेकून देतील. त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले. पण स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना केला.

ज्यावेळी शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला होता, तीच परिस्थिती आता आहे असे समजा. तुमच्यात जिद्द असेल तर सोबत राहा. मी तुम्हालाही सांगतो, तुमचं भविष्य उज्ज्वल वाटत असेल तर, जरूर तिकडे जा. प्रत्येकाला स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याचा अधिकार आहे. मी कुणाच्याही आड येऊ इच्छित नाही. मी पात्र नसेल तर सांगा, हे पद आता सोडायला तयार आहे, असा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला.

आपल्या माथी अनेकदा पराभव झाला, पण त्याने फरक पडत नाही. जिंकणं, पराभव मनावर अवलंबून असतं. हारल्यानंतर जिंकण्यासाठी जनता साथ देत असते. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. सेनेत माझ्यासोबत जी बुडेल ती निष्ठावंत सेना आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.