‘वर्षा’ बंगल्यावरील राजकीय बैठकांचे पुरावे सादर; आता तरी निवडणूक आयोग कारवाई करणार का? – सावंत

Sachin Sawant- लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर राजकीय बैठक घेऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार निवडणुक आयोगाकडे केली होती. ‘वर्षा’वरील बैठकांचे वार्तांकन विविध प्रसार माध्यमांनी प्रसारित व प्रकाशित केलेले असताना कारवाई करण्याऐवजी पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. या संदर्भातील आयोगाला पुरावेही सादर केले आहे. आतातरी निवडणूक आयोग डोळ्यावरील पट्टी काढून कारवाई करेल का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना बैठकांचे पुरावे सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, वर्षा बंगल्यावरील राजकीय बैठकांसंदर्भात तक्रार केल्यानंतर निवडणुका आयोगाने विचारणा केली असता मुख्यमंत्री कार्यालयाने उडवाउडवीची उत्तरे दिले असे माध्यमातून समजते. मला पुरावे सादर करण्यास सांगितल्याने २४ व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह व माध्यमांमधून छापून आलेल्या वृतांकनाची हार्ड कॉपी निवडणूक आयोगाला सादर केली. विरोधी पक्षांवर ज्या तत्परतेने कारवाई केली जाते तेवढी तत्परता सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत आयोग दाखवताना दिसत नाही. वर्षावरील बैठकांचा बोलका पुरावा सादर केल्यानंतर तरी निवडणूक आयोग कारवाई होईल अशी अपेक्षा करु असे सावंत म्हणाले.

उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयल हे श्रीरामाचे मोठे होर्डिंग लावून मते मागत आहेत. मोग्रा मेट्रो स्टेशनच्या बाहेर हे मोठे होर्डिंग असून त्यात प्रभू रामाचे चित्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे’ असा मजकूर आहे. हे होर्डींग सरळ सरळ आचारसंहितेचा भंग करणारे आहे. जनप्रतिनिधी कायद्यातील कलम १२३ व उपकलम ३ चे हे उल्लंघन आहे. शिवसेनेच्या प्रचार गीतामध्ये ‘भवानी’ शब्द आहे तो काढा अशी नोटीस निवडणूक आयोग पाठवतो परंतु सत्ताधारी पक्षाची तक्रार केल्यावर निवडणूक आयोग त्यावर कारवाई करत नाही. निवडणूक निष्पक्ष पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे परंतु त्यांचे वर्तन पाहता सत्ताधारी पक्षावर निवडणूक आयोग कारवाई करेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका