उद्धव ठाकरे यांचा आज बारसू दौरा; कोकणात राजकीय वातावरण तापले

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (6 मे) रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत.

तत्पूर्वी लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांना दिला आहे. चांगले प्रकल्प असल्यास ते गुजरातला आणि ज्या प्रकल्पांमुळे वाद निर्माण होतोय ते प्रकल्प माझ्या कोकणाच्या माथी मारले जात आहेत. हे खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंची दुटप्पी भूमिका उघड केली आहे.ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे. स्वत:च पत्र लिहायचे आणि रिफायनरी बारसूला करा, असे सांगायचे. मग स्वत:च चिथावणीखोर कृती करायची. यातून उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा पुढे आला आहे. त्यांना समाजाशी, विकासाशी काही एक लेनदेन नाही. विविध खांदे ते शोधतच असतात. आता बारसूचा खांदा त्यांना मिळाला आहे.अशी टीका फडणवीस यांनी केलीय.