उद्धवजी हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मात्र त्यांना विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावता का आले नाही ?

Mumbai – स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) वतीने त्यांच्या चित्राचे महाराष्ट्र विधिमंडळात अनावरण करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकारकडून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि नातू निहार ठाकरे (Uddhav Thackeray, Raj Thackeray and Nihar Thackeray) यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने पाठवलेले निमंत्रण उद्धव ठाकरे स्वीकारतात की नाही हे पाहावे लागेल.

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या तैलचित्रावरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना स्वतःच्या पिताश्रींचे तैलचित्र लावू शकला नाही असे म्हणत त्यांनी तुम्ही टीका करत राहा आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मात्र त्यांना आपल्याच पिताश्रींचे तैलचित्र लावता आले नाही. मी बोरवलीतून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैदानाचा उद्घाटन करून आलो आहे. ते तुम्हाला का जमले नाही असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

तुम्ही हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्व नको, बाळासाहेबांचा विचार नको आहेत. तर दुसरीकडे आता बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आम्ही लावतो आहे तर तुम्ही नाकाने कांदे सोलायचे प्रकार करत आहात असा हल्लाबोल त्यांच्यावर करण्यात आला आहे.