जीव देईन, पण देशाचे तुकडे कधीच होऊ देणार नाही; ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

Eid 2023 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान लक्षवेधी वक्तव्य केले आहे. देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मी जीव देईन पण देशाची फाळणी होऊ देणार नाही, असे म्हणत यावेळी ममता बॅनर्जी यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला. कोलकाता येथील रेड रोडवर ईदच्या नमाजासाठी जमलेल्या लोकांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘देशाची फाळणी नाही होऊ देणार’
ममता बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाल्या की, ‘आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे, आम्हाला दंगली नको आहेत. आम्हाला देशाची फाळणी होऊ द्यायची नाही, ज्यांना देशाची फाळणी करायची आहे, त्यांना मी ईदच्या निमित्ताने वचन देऊ इच्छिते की, मी जीव द्यायला तयार आहे, पण देशाचे तुकडे होऊ देणार नाही.’

लोकांना आवाहन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘शांतता राखा आणि कोणाचेही ऐकू नका. एक ‘देशद्रोही पक्ष’ आहे ज्याच्याशी आपल्याला लढायचे आहे.’ केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप सरकारवर होत आहे. याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मला तपास यंत्रणांशीही लढावे लागत आहे कारण माझ्यात हिम्मत आहे पण मी झुकायला तयार नाही.’

भाजपवर गंभीर आरोप
ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, ‘काही लोक भाजपकडून पैसे घेतात आणि मुस्लीम व्होट बँकेत फूट पाडतील असे म्हणतात, मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांच्यात मुस्लिम व्होट बँकेत फूट पाडण्याची हिंमत नाही. हे माझे तुम्हाला वचन आहे की पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, बघू कोण निवडून येते आणि कोण नाही.’

‘लोकशाही गेली तर सर्व काही संपेल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे. त्या लोकांनी एनआरसी आणली. मी त्यांना सांगू इच्छिते की मी त्यांना हे करू देणार नाही’, असे सूचक वक्तव्य यावेळी ममता बॅनर्जी यांनी केले.