आधी बेताल वक्तव्य केले मग गुन्हा दाखल झाला; संजय राऊत भलतेच संतापले

मुंबई – “हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका”, असं आवाहन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यामुळे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम ५०५ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल होताच संजय राऊत भलतेच संतापले असून ट्वीट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन” बेकायदेशीर ठरले आहे. व्हिप पासून शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेते पदी निवड करण्या पर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का?सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल. अस संजय राऊत यांनी म्हटले आहे.