Unseen Warriors of ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’

भारत स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ पण मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वांतंत्र होण्यास १ वर्ष १ महिना २ दिवस उशीर झाला.

या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या शुर वीरांना मान सन्मान मिळाला तसेच कित्येक जण यात सहभागी होऊन खूप चांगल काम करून सुद्धा त्यांचं कार्य पडद्याआडच राहिले.

यात प्रामुख्याने राष्ट्रसंत भगवानबाबा व वामणभाऊ यांचा उल्लेख करावा लागेल. ज्यांनी केलेलं कार्य, समजप्रबोधन, निजामाच्या हिंदू विरोधी रूढी परंपरांना विरोध यातून कित्येक स्वातंत्र्य सेनानी तयार झाले.

यात प्रमुख उल्लेख करायचा झालं तर थेरला, भायाळा, वाडझरी या परिसरातील बालाघाटाच्या डोंगरातील गावांमधून शेकडो हजारो स्वतंत्र सैनिक मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सहभागी झाले तर कित्येकांच्या कुटुंबाला २-२ वर्षे डोंगरात लपून छपून जीवन जगावं लागलं. या पट्ट्यात लपण्यासाठी जागा असल्यामुळे बीड व इतर जिल्ह्यातील स्वांतत्र्य सेनानी या परि सरातून आपल काम करत असत तर काही जण या परिसरात लपण्यासाठी असरा घेत होते. त्यात काहीना सरकार दरबारी मान मिळाला तर काही दुर्लक्षित राहिले.

माझं आजोळ वडझरी आईचे वडील आणि चुलते हे सात जण भाऊ व चार चुलत चुलते असा ११ जनांच कुटुंब! यातील बहुतेक जण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी तर उरलेलं सर्व कुटंब जवळागिरी, तगार व देवदर्याच्या डोंगरात लपून बसलेले असत. लहानपणी माझी दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी वडझरितच जाई. त्यातील काहींना मी भेटू शकलो बोलू शकलो ऐकू शकलो हे माझ भाग्य समजतो. ते सांगायचे भगवानबाबा सतत वडझरीला येत कीर्तन संपल्यानंतर गावातील निवडक तरुणांना रात्री एकत्र करायचे व निजामाच्या राजवटीत होणाऱ्या अन्याय, अत्याचार व पशुहत्या(कांदुरी) प्रथेविरूद्ध जागृती व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिरीहिरीने सहभागी व्हा असे सांगायचे. बाबांनी सांगितलेल्या उपदेशामुळे प्रभावित होऊन वाडझरी, थेरला, भायाळा या परिसरातील तरुण एकत्र आले व त्यांनी निजामाच्या विरोधी लढ्यात कोणी सक्रिय तर कोणी लपून छपून सहभागी झाले.

स्वातंत्र्य सैनिकांच गाव म्हणून माझे आजोबा गेनाजी सानप सवंत्र्या सैनिकांमध्ये नाव नव्हत पण त्यांचे ५ भाऊ स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे जवळपास सर्वच भाऊ लढ्यात सहभागी असल्यामुळे त्यांना कुटुंबासह दीड वर्ष डोंगरात लपून काढावे लागले. यापैकी सर्वच अजोबांचां मला सहवास भेटू शकला नाही कारण काही माझ्या जन्मा अगोदर तर काही मी लहान असतानाच गेले. पण या सर्व गोष्टी व अनुभव माझे आजोबा गेनबा सानप व स्वातंत्र्य सैनिक चुलत आजोबा महदेव सानप, साहेबराव सानप, उत्तमराव सानप यांना मी पाहू शकलो यांच्याशी खूप वेळा बोलू शकलो, ऐकण्याचा योग आला आणि स्वांतत्र्य लढ्यातील अनेक रोमहर्षक किस्से ऐकताना आजोबांच्या डोळ्यात पाणी तर माझ्या अंगावर काटा यायचा. खरच मला सुद्धा स्वतःला धन्यता वाटायची की माझे आजोबा मंडळी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते! महादेव दादासाहेब सानप व भानुदास पटीलबुवा सानप हे निजमाच्या पाटोदा काचेरीतून दारूगोळा(रायफल) लुटण्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते असे सांगायचे. तर साहेबराव सानप हे जवळा महारमाळ येथे लपत हिंडत होते. असेच एकदा आषाढी एकादशी होती आणि उपवासासाठी भगर आणण्यासाठी दुपारच्या पहार्यात गावात गेले. वाड्यातून एक पायली भगर घेऊन निघाले तेव्हड्यात राझाकाराच्या सैनिकांनी त्यांना पाहिलं व त्यांचा पाठलाग चालू केला. ते गावच्या नदीतून पळत सुटले, पायात सिंदाडीचा काटा घुसला व तो वरून निघालं पण काटा काढत बसले असते. तर राझाकाराच्या हाती सापडले असते. मरणाच्या भीतीने तसेच पाळले व मेळातून(नद्यांचा संगम) जवळागिरच्या डोंगरावर जंगलात पळून गेले म्हणून वाचले. असे कित्येक प्रसंग त्यांच्या तोंडून ऐकले की अक्षरशः स्वातंत्र्याचा रणसंग्राम डोळ्यासमोर उभा राहायचा.

याचे आणखी एक उदाहरण माझं गाव सावरगाव बोरगाव भाऊ बाबा च माहेरघरच म्हणायचं. इथे बाबा सतत यायचे तर बोरगाव हे भाऊच अजोळ. माझ्या आजोबांकडून ऐकलेली सत्य घटना, निजामाचे सैनिक रोहिले यांची कचेरी आमच्या भागात चकलांबा आणि मनुर येथे होती. त्यांच्या अन्यायाने सामान्य लोक खूप कंटाळले होते. बाबांचं कीर्तन होत त्यांनतर हा विषय झाला आणि बाबांनी आपल्या परीने प्रतिकार करा, स्वतः च आणि कुटुंबाचं गावच संरक्षण करा आस सांगितलं. आमच्या गावात मझे आजोबा रामकिसन खेडकर व आणखी काही लोक गोफण आणि इचका यात पटाईत होते.

सावरगाव, बोरगाव, तींतरवणी व मातोरीच्या लोकांना सुगावा लागला की रोहील्यांचे सैनिक चकलंब्यावरून मतोरी, सावरगाव-बोरगाव ला येसणार आहेत.

मग काय प्रामुख्याने बोरगावचे पंढरीनाथ राख, रघुनाथ राख, एकनाथ राख सावरगावचे पंढरीनाथ पाटील खेडकर व त्याकाळी डाके टाकणाऱ्या हरीभाऊ रोकडे यांची टोळी यांनी योजना बनवली की रोहिले मारायचे. रोहील्यांची जरब तर खूप होती मग त्याना समजू नये म्हणून तोंड बांधून आणि कोणी मारलं हे पत्ता लागू नये म्हणुन सर्वजण चकलांब्याच्या वाटेवर चोरपुरीच्या जंगलात दबा धरून बसले. रोहील्याचे सैनिक आले आणि या दबा धरून बसलेल्या १००-१५० लोकांनी त्यांच्यावर गोफण गुंडे व इच्के यांनी हल्ला चढवला. अचानक जंगलात झालेल्या हल्ल्याने रोहिले घायाळ झाले लगेच या चार गावच्या लोकांनी त्यांना तलवारी, कोयते ब कुऱ्हाडीनं ६ सैनिक कापून काढले! यावर आजही संपूर्ण परिसरात चर्चा होत राहते.

रोहिल्याचे सैनिक त्यानंतर कित्येक दिवस या चार गावात यायचे व या कटात सहभागी असणाऱ्यांना शोधायचे. पण या चार गावातून कोणीही फितूर न झाल्यामुळे कोणाची नाव उघड झालं नाही. या नंतर जवळपास एक वर्ष हे सैनिक गावात येवून धमकवायचे व नाव माहीत करून घेण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांना या कटातला एकही माणूस हाती लागला नाही.

हा पराक्रम सर्वदूर पोहचला होता, मराठवाडा स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे पोलीसही गावात येवून विचारायचे की हा पराक्रम कोणी केला पण भीती व आज्ञान या मुळे कोणीही पुढे आले नाही व स्वत्यंत्रानंतरही कोणी नाव सांगितले नाही की कुठे पोलीस डायरीत यांची नावं आली नाहीत नसता माझे अजोबंसहित या ४ गावातील किमान ५०-६० लोक स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत दिसली असती!

ही मला माहीत असलेली घटना, प्रसंग आणि मांनस, अशी कित्येक लढवय्ये होते जे कागदोपत्री स्वातंत्र्य सैनिक नाही झाले पण मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी जीवाची बाजी लावली, प्राणांची आहुती दिली अश्या सर्व ज्ञात अज्ञात विरांच स्मरण करतो व त्यांना आदरांजली वाहतो.

जय हिंद!
जय मराठवाडा!!
जय महाराष्ट्र!!!

डॉ रवि खेडकर