कबीर सिंगनंतर बॉलीवूडमध्ये मला फक्त मेडच्याच भूमिकेत ओळखतात; वनिता खरातने व्यक्त केली खंत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या मराठी मालिकेतून वनिता खरात (Vanita Kharat) घराघरात पोहोचली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा व्यतिरिक्त वनिताने रानबाजार या गाजलेल्या मराठी वेब सीरिजमध्ये महिला पोलीस हवालदाराची भूमिका केली होती. तसेच कबीर सिंग (Kabir Singh) या हिंदी चित्रपटात तिच्या मोलकरणीच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु या भूमिकेनंतर तिला एका गोष्टीची खंत असल्याची तिने सांगितले आहे.

अलिकडेच वनिताने स्वराज या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कबीर सिंगनंतर सातत्याने मला बॉलिवूडमध्ये घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका ऑफर होते असं सांगत खंत व्यक्त केली.

“मी कबीर सिंगमध्ये घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका केली होती. आता हिंदीमधल्या सगळ्याच कास्टिंग एजन्सी मला ओळखतात. त्यांच्याकडे माझं प्रोफाइल आहे. पण ते लोक फक्त मला मेडच्याच भूमिका ओळखतात”, असे वनिता खरातने म्हटले आहे.