टीम इंडियाला मिळणार नवा संघ निवडकर्ता? सचिनसोबत खेळलेल्या दिग्गजाच्या नावाची चर्चा

यावर्षी आशिया कप, एकदिवसीय विश्वचषक यासारख्या मोठ्या स्पर्धांसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. अशा परिस्थितीत निवड समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी स्टिंग ऑपरेशन व्हायरल झाल्यानंतर चेतन शर्मा यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या शिवसुंदर दास अंतरिम मुख्य निवडकर्त्याच्या (Team India Chief Selector) भूमिकेत आहेत. पण टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते.

”क्रिकेट सुधारक समिती असताना वीरेंद्र सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर अनिल कुंबळे यांना विचारणा करण्यात आली. आता वीरू पुन्हा अर्ज करण्याची शक्यता कमीच आहे, कारण मिळणारं मानधन हे त्याच्या स्टेटसला शोभेसं नाही. निवड समिती अध्यक्षांनाही बीसीसीआय ४-५ कोटी देत नाहीत. बीसीसीआयने त्यांच्याही पगारात वाढ केली, तर दिग्गज खेळाडू अर्ज करतील, असे वाटते,”असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.