विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; महाविकास आघाडी- भाजपमध्ये थेट लढत 

नागपूर – विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने आहेत. नागपूर आणि अकोला- बुलढाणा -वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर आज मतदान होत आहे.

नागपुरात काँग्रेसनं काल (गुरुवारी) ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलडाणा-वाशिममधून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरीया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत.

या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करुनच मतदारांना मतदान करावे लागणार आहे.