बिपिन रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांच्या पार्थिवाला तामिळनाडूत भावूक निरोप, जनतेकडून शववाहिकेवर पुष्पवृष्टी

नवी दिल्ली- तमिळनाडू इथं हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या जनरल बिपीन  रावत आणि इतर 12 जणांचे मृतदेह काल संध्याकाळी दिल्लीतील पालम हवाई तळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर 11 जणांना श्रद्धांजली अर्पण केली.

संरक्षण मंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. या अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना पुढील उपचारांसाठी बंगळूर इथल्या हवाई दलाच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, शववाहिकेतून रावत यांचे  पार्थिव नेलं जात असताना तामिळनाडूमधील नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यावेळी ‘भारत माता की जय’ घोषणा देण्यात आल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला असून यावेळी स्थानिक ‘भारत माता की जय’ घोषणा देत असल्याचं दिसत आहे. पार्थिव रुग्णवाहिकेतून सुल्लूर एअरबेसमध्ये नेले जात होते. यावेळी स्थानिकांनी रुग्णवाहिकांवर फुलांची उधळण करत श्रद्धांजली देखील वाहिली.