आम्ही अद्याप कोणालाही समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला नाही – एकनाथ शिंदे

Mumbai – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.आम्ही अद्याप कोणालाही समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही ४० पेक्षा अधिक आमदार एकत्र आहोत. आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी टिव्ही ९ सोबत बोलताना म्हटले आहे.