वाट कसली पाहात आहात? राजीनामा द्या; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई – शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले असून राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे.

शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. नगर विकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते होते. मात्र, शिवसेनेनं आता त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यानंतर गटनेते पदाची जबाबदारी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे दिली आहे.

यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. हे सगळं होत असताना एक क्षणही मुख्यमंत्रीपदावर राहायला नको होतं. पण ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. कायद्यांबाबत किती माहिती आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. ५६ मधले ३५ गेले, राहिले किती? सरकार अल्पमतात आल्यानंतर राजीनामा का देत नाहीत? वाट कसली पाहात आहात? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. एकनाथ शिंदे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीच्या बाहेर कुणालाही त्याचे अधिकार नाहीत. शिवसेनेच्या वाट्याचं सरकार फक्त मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच होतं , असंही ते म्हणाले.