माझ्याकडे 35 आमदार, विचार करा आणि मला काय ते सांगा; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनाच निरोप

मुंबई – शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले असून राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे.

शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. नगर विकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते होते. मात्र, शिवसेनेनं आता त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यानंतर गटनेते पदाची जबाबदारी शिवडीचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांच्याकडे दिली आहे.

यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला (Gujrat) गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेनेसाठी पुढची वाट ही प्रचंड खडतर असल्याचं मानलं जात आहे. शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले तर महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

या सगळ्या प्रकरणात आता सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन तब्बल 20 मिनिटं फोनवर बातचीत (conversation) झाली. यावेळी एकनाथ शिंदेंनी थेट अल्टिमेटमच (Ultimatum) दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी थेट सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर नार्वेकर यांनी आपल्या फोनवरुनच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं करुन दिलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, ‘माझ्याकडे 35 आमदार आहेत. त्यामुळे जर आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असाल तर पक्ष फुटणार नाही. यावर विचार करा आणि मला काय ते सांगा.’ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.