बंडखोर आमदारांचा गट मुंबईत कधी येणार? केसरकर स्पष्टपणे म्हणाले…

मुंबई – राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत.

दरम्यान, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar)  यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना आम्ही या अगोदरही सांगितले होते. आम्हाला महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही.  आम्ही कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नाही. आजही आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. बाळासाहेबांचे विचार मांडणारे आम्ही एकत्र आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी  रस्त्यावर येण्याची गरज नाही. कायदा हातात घेऊ नये,  असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच परिस्थिती नीट झाल्यावर आम्ही मुंबईत येऊ असे देखील ते या वेळी म्हणाले. आम्ही भाजपसोबत (BJP) गेल्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र आमचा गट सध्या कोणत्याही पक्षासोबत नाही, असे केसरकर यावेळी म्हणाले.