शिवसेनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा निर्णय घेतला आहे – दीपक केसरकर

गुवाहाटी : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. आज या गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, शिंदे साहेब आमचे नेते आहेत,एक गैरसमज असा, की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो,पण आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत,आमदारांचे काही अधिकार असतात, मागण्या असतात,आम्ही पक्षप्रमुखांना अनेक वेळा सुचवलं होतं की ज्या युतीत आपण लढलो, त्यांच्याच सोबत राहूया,कित्येक वेळा उद्धव साहेबांना आम्ही हे सांगितलं, ते ऐकतील,इतके वेळा इतके जण सांगतात, याचा अर्थ त्यात तथ्य असेल,कोणीही आम्हाला असं करा सांगितलं नाही.

ज्या व्यक्तीने रस्त्यावर उतरायला सांगितलं त्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली नाही. अन्य व्यक्तीने असं सांगितलं असतं तर कारवाई केली असती की नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे नॉर्म पाळावेत ही आमची विनंती आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, तशी गरजच नाही. दोन तृतियांश बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो. आम्हीच शिवसेना आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना हायजॅक करायचा प्रयत्न (Congress and NCP are trying to hijack Shiv Sena) केला होता. शिवसेनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.