विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे समीकरण बदलले; जाणून घ्या कुणाचा फायदा होणार ?

नवी दिल्ली- देशातील 5 राज्यांमध्ये गुरुवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या निकालाने या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला मजबूत स्थितीत आणले आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की यूपीमध्ये भाजपच्या मोठ्या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उत्तराधिकारीबद्दल निर्णय घेण्याची पुरेशी संधी असेल. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपणार आहे.

दरम्यान, यूपीमधील निवडणुकीचा निकाल समाजवादी पक्षाच्या बाजूने लागला असता, तर भाजपला बिजू जनता दल (बीजेडी), तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागले असते.

लोकसभेचे माजी सरचिटणीस पी श्रीधरन म्हणाले की, यूपीमध्ये बंपर विजयानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) फायदा झाला आहे. एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विजयांच्या मालिकेमुळे भाजपसाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोपी झाली आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये फूट निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, आता या निकालामुळे ते भाजपशी फारकत घेणार नसल्याचे दिसत आहे.त्याचवेळी विरोधकांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले होते. मात्र, याबाबतची चर्चा फारशी पुढे सरकलेली नाही.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 4,896 मतदार आहेत. यामध्ये राज्यसभेचे 233, लोकसभेचे 543 आणि विधानसभेचे 4,120 सदस्य आहेत. विधान परिषदेचे सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य हे याचा भाग नसतात. यामध्ये प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ इतके निश्चित करण्यात आले आहे. तर राज्यांमध्ये आमदाराच्या मताचे मूल्य तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात ठरविले जाते. देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असल्याने, यूपीच्या आमदारांचे मत मूल्य सर्वाधिक 208 आहे. अशा प्रकारे यूपी विधानसभेच्या मतांचे एकूण मूल्य 83,824, पंजाब 13,572, उत्तराखंड 4480, गोवा 800 आणि मणिपूर 1080 आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुका एकल हस्तांतरणीय मताद्वारे आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीचे अनुसरण करतात. 1971 च्या जनगणनेच्या आधारे प्रत्येक मताचे मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पूर्वनिश्चित केले जाते. या अंतर्गत, 4,896 मतांचे एकूण मूल्य 10,98,903 आहे. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 50 टक्के जास्त मते मिळणे आवश्यक आहे.