मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण ? कंबोज यांची पोलिसांत लेखी तक्रार

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण ( Ran Couple Hanuman Chalisa Recite ) करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला ( Shivsainik Attack Mohit Kamboj Car ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाला आहे.

मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे. शिवाय त्यांच्यावर रेकी केल्याचा देखील अजब आरोप सेनेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप होऊ लागला आहे. यातच आता याप्रकरणी मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यांनी लेखी तक्रार नोंदवली आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात लेखी तक्रार नोंदवली. मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावानं त्यांना बळजबरीनं गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.

वांद्रे येथील कलानगरजवळच्या सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन या घटनेतील सत्य समोर येऊ शकतं, असंही मोहित कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण आहे? याचा तपास करण्यात यावा, असंही कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कलम 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी तक्रारीतून मुंबई पोलिसांकडे केली आहे.