बापू बिरू वाटेगावकर कोण होते? बापूंचे नाव ऐकताच गुंड चळाचळा का कापत असत? 

सांगली – पश्चिम महाराष्ट्रात बापू बिरू वाटेगावकर यांचे नाव माहित नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यात चार दशके बापूंनी स्वतःची सरकार समांतर यंत्रणा उभारली होती. अडल्या-नडल्यांना मदत, ग्रामस्थांना छळणाऱ्यांचा कर्दनकाळ अशी ‘रॉबिनहूड’ पद्धतीची बापूंची प्रतिमा हाेती. आज आपण याच बापू बिरू वाटेगावकर यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.

त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. गरीबांविषयी बापूंना विलक्षण कळवळा होता. वाळवा तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. या गावातील रंगा शिंदे हा गोर-गरीबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. त्या बापू बिरू वाटेगावकरांनी संपवले. रंगाच्या भावानेही असाच उच्छाद मांडला होता तेव्हा त्याचाही खून त्यांनी केला. पुढे दरोडे आणि हत्यांप्रकरणी त्यांना शिक्षाही झाली होती. यानंतर मात्र त्यांनी दरोडे घालणे सोडले आणि समाज कार्याला वाहून घेतले होते.

जन्मठेप भोगून सुटल्यानंतर ते प्रवचन, व्याख्याने देत. अखेरपर्यंत मांसाहार, दारू, पान, तंबाखू, बिडी, गुटखा याला स्पर्श केला नाही. ‘पैसाअडका ही खरी संपत्ती नाही. अंगात ताकद पाहिजे. नदीच्या पान्यासारखं रक्त अंगात खेळलं पायजे. ६० वर्षांत मी कुठलंही व्यसन केलं नाही,’ असा उपदेश ते तरुणांना करत.

ते सातत्याने गरीबांना मदत करत होते. मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पेटून उठत होते. महिलांवरील अत्याचारांची त्यांना चीड होती. हुंडा, देण्याघेण्याच्या प्रकारावरून न नांदवणाऱ्या नवरोबांनाही बापू दम द्यायचे. त्यांच्यामुळे अनेक संसार सुरळीत झाले.  त्यांच्या आयुष्यावर सिनेमा निघाला. यामध्ये बापू बिरू वाटेगावकर यांची भूमिका अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी साकारली होती.

बापू बिरू वाटेगावकर सुमारे कित्येक वर्षे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे तर गरीबांना न्याय मिळवून देताना बापू बिरूंच्या हातून १२ खून झाले. २०१८ साळी वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. डोक्यावर पिवळं मुंडासं, कपाळावर भंडारा, पांढऱ्या दाढी-मिशा आणि खांद्यावर काळी घोंगडी घातलेले बापू बिरू वाटेगावकर आजही कित्येकांना प्रेरणा देत आहेत.