पवारनीतीपुढे सारेच फेल : शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय का घेतला ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे ?

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा (Sharad Pawar Resigning) केली आहे. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच बरोबर अजित पवार भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे दररोज येत होत्या. या सर्व घडामोडी घडत असताना अजित पवारांचा भाजप प्रवेश रोखण्याच्या उद्देशानेच पवारांनी हा निर्णय घेतला का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सोबतच पवारांच्या प्रकृतीचे देखील कारण प्रमुख असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटना आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांसाठी आगामी काळात काम करण्यासाठी देखील त्यांनी हा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.