देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का?  चंद्रकांत पाटील म्हणाले,…  

पुणे – भाजपाने (BJP) नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. याबाबत फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh) केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

याच मागणीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस हे कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांचा विचार हा कर्तृत्वाच्या आधारावरच झालेला आहे. त्यामुळे तशी मागणी कोणीही करू शकतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. या देशामध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा तसेच मागणी करण्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस हे जात, धर्माच्या वर आलेले आहेत. ते एक कर्तृत्ववान नेते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार हा त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारेच झालेला आहे. त्यामुळे मागणी कोणीही करू शकतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.