जोपर्यंत बाबा जिंकत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही; नवज्योत सिंह सिद्धूच्या कन्येची भीष्मप्रतिज्ञा

अमृतसर – पंजाब कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच धुसफूस सुरु आहे. यातच आता कॉंग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धूची मुलगी राबिया सिद्धूने एक शपथ घेतली आहे. जोपर्यंत आपले वडील निवडून येत नाहीत तोर्पर्यंत आपण लग्न करणार नाही अशी शपथ तिने घेतली आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी राबिया सिद्धू ही मैदानात उतरली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी ती घरोघरी प्रचारात गुंतलेली आहे. या जागेवर अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंह सिद्धू यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यावर प्रतिक्रिया देताना राबिया सिद्धू म्हणाली की, ते भावूक झाल्याने तसे बोलले. जोपर्यंत आपले वडील निवडणूक लढवत नाहीत तोपर्यंत आपण लग्न करणार नाही.