आयआरसीटीसी खाद्य पदार्थ पुरवण्याची सेवा पुन्हा सुरु करणार

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे खान-पान आणि पर्यटन परिषदेची अर्थात आयआरसीटीसीची तयार खाद्य पदार्थ पुरवण्याची सेवा येत्या 14 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड प्रतिबंधक नियम शिथिल होत असल्यामुळे तसंच प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही सुविधा पुन्हा सुरू करत असल्याचं आयआरसीटीसीनं म्हटलं आहे.

एकंदर रेल्वे गाड्यांपैकी 428 गाड्यांमध्ये ही सुविधा या आधीच सुरू केली होती. यावर्षी जानेवारीपर्यंत 80 टक्के रेल्वे गाड्यांमध्ये तयार खाद्यपदार्थ पुरवले जात होते; आता उर्वरित 20 टक्के गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल असं आयआरसीटीसीनं सांगितलं.

दरम्यान, देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 50 हजार 407 नवीन कोरोनाबाधीतांची नोंद झाली, तर 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड 19 मुळे 804 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.