जगातील एक असे ठिकाण जिथे नाहीत नोटा किंवा चिल्लर! दगडांचा केला जातो चलन म्हणून वापर

Yap Island : एक काळ असा होता जेव्हा चलन (Currency) नव्हते आणि त्या काळात वस्तु विनिमय पद्धत चालत असे. वस्तु विनिमय प्रणाली म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला काही हवे असेल तर त्याला वस्तूंच्या बदल्यात काहीतरी द्यावे लागेल. त्याच वेळी काळाबरोबर, प्रथम रत्ने… नंतर नाणी… आणि हळूहळू… चलन वापरले जाऊ लागले. मात्र, आजही जगाचा एक भाग असा आहे, जिथे व्यवहार नोटांच्या सहाय्याने होत नाहीत तर दगडांच्या (Stone) माध्यमातून केले जातात.

इथे ज्या ठिकाणाबद्दल बोलले जात आहे, ते म्हणजे पॅसिफिक महासागराने (Pacific Ocean) वेढलेले याप बेट. हे बेट सुमारे 100 चौरस किलोमीटरमध्ये पसललेले आहे, ज्यामध्ये सुमारे 12 हजार लोक राहतात. हे लोक व्यवहारासाठी नोटांचा वापर करत नाहीत तर दगडांच्या बदल्यात वस्तूंची खरेदी-विक्री करतात. येथे ज्या व्यक्तीकडे सर्वात वजनदार दगड आहे, तो श्रीमंत समजला जातो. विशेष म्हणजे या दगडांच्या मधोमध एक छिद्र आहे, ज्याचा वापर करून माणूस दगड इकडून तिकडे हलवू शकतो.

दगडांवर मालकाचे नाव लिहिले जाते
मोठा व्यवहार किंवा मोठी देवाणघेवाण करावी लागली तरी येथे लोक दगड वापरतात. दुसरीकडे, काही दगड इतके जड असतात की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे हे लोक तो दगड तिथेच सोडून देतात. मात्र, ते ओळखता यावे म्हणून या दगडावर मालकाचे नाव लिहितात. याप बेटावरील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्याच्या कुटुंबाकडे चांगल्या आकाराचे आणि वजनाचे पाच दगड आहेत.

याची सुरुवात का आणि कशी झाली?
दगडांद्वारे व्यवहाराची प्रक्रिया येथे शतकानुशतके सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया कशी आणि केव्हा सुरू झाली याची अचूक माहिती कोणालाही नाही.