आमच्या नेत्यांवर ईडी लावण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही – यशोमती ठाकूर

शिर्डी  : आमच्या नेत्यांवर ईडी लावण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. आमच्या नेत्यांवर वाईट नजरेने बघणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ असा इशारा देत काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिर्डी येथील नव संकल्प शिबिरातून केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने शिर्डी येथे दोन दिवसीय नव संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी नव संकल्प शिबिरासंदर्भात संवाद साधला. केंद्र सरकारच्या ईडी (अंमलबजावणी संचालनालय)कडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटिस पाठविण्यात आल्याबद्दल ॲड. यशोमती ठाकूर यांनी निषेध नोंदविला. तसेच यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. ज्या ठिकाणी सुई पण बनत नव्हती त्या देशात कॉँग्रेसच्या काळात अनेक मोठे उद्योग उभे राहिले. कॉँग्रेसच्या काळात ज्या सार्वजनिक संस्था उभ्या राहिल्या त्या आज विकण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. या देश विरोधी सरकारला कसे रोखता येईल याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांची सामूहीक पत्रकार परिषदेत देखील पार पडली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उदयपूर येथे नव संकल्प शिबिर पार पडल्यानंतर आता देशात ठीक ठिकाणी प्रदेश काँग्रेसच्यावतीने शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने देखील शिर्डी येथे दोन दिवसीय नव संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास राज्यातील ज्येष्ठ, वरिष्ठ आणि युवा नेते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. आज पार पडलेल्या विविध चर्चासत्रांबद्दल माहिती देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिबिरातील चर्चेविषयी माहिती दिली.