आमदारांना निधी वाटता मग गरीबांसाठी पैसे का नाही ? जयंत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांना घेरले

मुंबई:- गरीब वंचित घटकांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारहून ५० हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी आज लक्षवेधी सुचनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ही मागणी करत असताना ‘हे सरकार फक्त धनिकांचा विचार करत आहे, गरीबांचाही विचार करा’ असे म्हणत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना घेरले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, आज रुपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाले आहे. २१ हजारांची किंमत आज जवळपास ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत झाली आहे. याचा विचार करून ही मर्यादा वाढवण्यात यावी. आमदारांना ५० कोटी, १०० कोटी, ५०० कोटी रुपये निधीच्या माध्यमातून वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मग गरीब जनतेसाठी हे सरकार आखडते हात का घेत आहे ? हे सरकार गरीबांचे नसून धनिकांचे आहे हे यातू सिद्व होते असा आरोप त्यांनी केला.

उत्पन्नाची मर्यादा ५० हजार झाली पाहिजे अशी खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांची खासगीत भूमिका राहिली आहे. मात्र आज टप्प्याटप्प्याने मर्यादा वाढवू असे उत्तर देत हसन मुश्रीफ हे टप्प्याटप्प्याने आपली भूमिका बदलत आहे असा चिमटा त्यांनी काढला. राज्याचे अर्थमंत्री हे तुमचेच आहे. ते तुमच्या मताचे आहे त्यामुळे कोणतीही चिंता न करता ही मर्यादा ५० हजार करा अशी मागणी त्यांनी लावून धरली.