‘तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता’

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी लढाई केवळ पावसामुळे लढली जाते असे नाही, तर लढाई ही हुशारीने जिंकली जाते…. देशात संविधान तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. आमदार हा खरेदी-विक्री संघ आहे, की कांद्याचा भाव आहे अशी टीका पक्षाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.

निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला आदरणीय शरद पवारसाहेब लागतात. आता अचानक तुम्ही म्हणता की, आम्हाला शरद पवार नको. तुम्ही साहेबांचा चेहरा का वापरता. तुम्ही मतदारांना आकर्षित करू शकाल असे चेहरे वापरावे. तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता. ज्याला गुरु बोलायचे त्यालाच दुःख द्यायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पवार साहेबांना जखमी करून टाकलंय. पण हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार पवार साहेबांसोबत आहेत ते वाचतील अन्यथा इतर सर्व घरी जातील, असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

शरद पवार (Sharad Pawar) माझी खासगी मालमत्ता आहे का अशी विचारणा केली जाते. मात्र ही सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण जेव्हा बापावर येते तेव्हा छातीचा कोट करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथे सर्व पांडव आहेत आणि आपला श्रीकृष्ण हे शरद पवार साहेब आहेत. इतिहास सांगतो की अधर्माविरोधात धर्माची लढाई होते, तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. नाशिकला साहेब येणार तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले.